नेवासा – गेल्या १०४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेलापूर-परळी रेल्वे मार्गाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पावसाळी अधिवेशनात लोकसभेत उपस्थित करत केंद्र सरकारकडे तातडीने मंजुरी आणि काम सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे. हा रेल्वे मार्ग मंजूर होण्यासाठी अहिल्यानगरचे दोन खासदार संसदेत लढत असताना बीडचे खासदार बजरंग सोनवणे मात्र उदासीन का, असा सवाल बेलापूर-परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी यांनी उपस्थित केला आहे. ब्रिटिशकालीन मंजुरी, तरीही रखडलेला प्रकल्प बेलापूर-परळी रेल्वे मार्गाला ब्रिटिशांनी मंजुरी देऊन भूसंपादन आणि माती भरावाचे काम पूर्ण केले होते. जून २०२२ मध्ये या मार्गाचे सर्वेक्षण अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले. मात्र, ‘आरओआर’ (रिटर्न ऑन रेट) चे कारण देत गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प मंजुरीपासून वंचित आहे. यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने अन्याय होत असल्याचे खासदार वाकचौरे यांनी लोकसभेत परखडपणे मांडले. केंद्र सरकारने दुप्पट तोट्यातील काही रेल्वे मार्गांना मंजुरी देत काम सुरू केले, पण फायद्याचा आणि दळणवळणाला चालना देणारा हा मार्ग प्रलंबित ठेवल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिर्डी-तिरुपती अंतर कमी होणार, रेल्वेला उत्पन्नाची संधी खासदार वाकचौरे यांनी या रेल्वे मार्गाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, यामुळे जागतिक तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी आणि तिरुपती बालाजी यांच्यातील ५५० किमी अंतर कमी होईल. तसेच, या मार्गावर १० ते १५ सहकारी साखर कारखाने असल्याने मालवाहतुकीतून रेल्वेला मोठे उत्पन्न मिळेल. राज्य सरकार ५० टक्के खर्च उचलण्यास तयार असतानाही केंद्राची मंजुरी रखडल्याने दोन जिल्ह्यांचा विकास खुंटल्याचे त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणले. यावर मंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली असून, रेल्वे राज्यमंत्री वी. सोमन्ना आणि रवनीत सिंह यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. खासदारकी पणाला लावणार – वाकचौरे दैनिक प्रभातशी बोलताना खासदार वाकचौरे यांनी ठामपणे सांगितले, “बेलापूर-परळी रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी मी माझी खासदारकी पणाला लावीन.” बजरंग सोनवणे यांच्यावर उदासिनतेचा आरोप खासदार वाकचौरे यांनी बेलापूर-परळी रेल्वे मार्गाचा तारांकित प्रश्न केला, तर नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनीही याबाबत निवेदन दिले. मात्र, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या दिल्लीतील पीए यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही भेट घडवली गेली नाही, अशी खंत रितेश भंडारी यांनी व्यक्त केली. “खासदार सोनवणे या प्रश्नाबाबत उदासीन का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेत बेलापूर-परळी रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्यास या भागातील दळणवळण सुधारेल, तीर्थक्षेत्रांना जोडले जाईल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. खासदार वाकचौरे यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न आता मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.