Sanjay Gaikwad : महाराष्ट्र पोलिसांबद्दल ‘ते’ आक्षेपार्ह वक्तव्य आलं अंगलट; आमदार गायकवाडांवर गुन्हा दाखल

बुलडाणा : महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही. पोलिसांनी जर ५० लाख पकडले तर ते ५० हजार दाखवतात, असे आक्षेपार्ह विधान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. यानंतर संजय गायकवाड सर्व बाजूंनी अडचणीत आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना समज दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
या वक्तव्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. संजय गायकवाड म्हणाले, गुन्हा दाखल झाला आहे तर त्याला मी सामोरे जाईल. मी केलेल्या वक्तव्यात महाराष्ट्र पोलिसांचा चुकून उल्लेख झाला. मला ते स्थानिक पोलिसांबद्दल बोलायचे होते. महाराष्ट्र पोलिसांचे धाडस, कर्तृत्व विसरता येणार नाही. ज्या चांगल्या अधिका-यांना माझ्या वक्तव्याबद्दल मनस्ताप झाला असेल, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करत आहे. मात्र, काही लोकांमुळे पोलीस बदनाम झाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांबद्दल बोललेले शब्द मी मागे घेत आहे.
एकनाथ शिंदे पण आमचेच आहे. तसेच देवेद्रं फडणवीसही आमचे नेते आहे. ते मला याबद्दल बोलले असते तरी काही अडचण नाही. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मी माझे शब्द मागे घेतो. या वक्तव्यावर आपण विनम्रपणे दिलगिरी व्यक्त करत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.




