पिंपरी चिंचवडमधील ‘त्या’ हत्येचा झाला उलघडा; शेजाऱ्यानेच रचला होता प्लॅान, तिला घराबाहेर बोलावलं अन्…

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडमध्ये एका १८ वर्षीय तरुणीची धारधार शस्त्राने हत्या केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. ही हत्येची घटना रविवारी घडली असून आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या तरुणीची हत्या आर्थिक व्यवहारांमधून झाली असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. परप्रांतीय असलेल्या शेजाऱ्यानेच तरुणीची हत्या केल्याचे पुढे आले असून पोलिसांनी या प्रकरणी मामा-भाच्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी १८ वर्षींय कोमल भरत जाधव या तरूणीची हत्या झाली होती. या प्रकरणी उदयभान जाधव आणि त्याच्या भाच्याला पोलिसांनी अटक केली आहे. उदयभान हा मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती समजते. कोमल जाधव ही पिंपरी चिंचवडमध्ये वाल्हेकरवाडी परिसरात कुटुंबियींसह राहत होती. रविवारी कोमल घरी असताना शेजारी राहणाऱ्या उदयभान जाधव याच्याशी वाद झाला. दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाल्यानंतर उदयभानने तिला संपवण्याचा कट रचला.
भाच्याला हताशी धरून उदयभानने हत्येचा कट रचला. त्याने रविवारी रात्री कोमलला घराच्या बाहेर बोलावून घेतलं. त्यावेळी त्यांनी धारधार शस्त्राने कोमलवर हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की कोमलचा हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. त्या दोघांमध्ये काही आर्थिक व्यवहारही झाले होते. या व्यवहारातूनच हत्या झाली असून यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.





