प्रभात वृत्तसेवा पारगाव – दौंड तालुक्यातील पारगाव येथे सकाळच्या वेळी दाट धुक्यात गाडी ओव्हरटेक करताना पुढील वाहनाचा अंदाज न आल्याने छोटा हत्ती व दूध टँकरच्या झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.कमल टुले (वय ४६, रा. एकेरीवाडी), असे जागीच मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पती आबासो टुले (वय ५२), मुलगा देविदास टुले (वय (२८), असे दोघे गंभीर जखमी झालेल्याची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील एकेरीवाडी येथील हे टुले कुटुंबीय आठवडे बाजारी भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतात. त्यासाठी शिरूर येथून भाजीपाला खरेदी करण्यासाठी त्यांना भल्या पहाटे जातात. हे कुटुंब पहाटे शिरूर येथून भाजीपाला घेऊन पारगावच्या दिशेने येत होते. पहाटेच्या वेळी धुक्याची दुलई असल्याने रस्त्यावर समोरच्या वाहनांचा अंदाज येत नव्हता. त्याचवेळी छोटी हत्ती टेम्पोतून टुले कुटुंबीय होते. त्यांनी धुक्यात गाडी ओव्हरटेक करताना पुढील वाहनांचा अंदाज आला नाही. त्यात समोरून येणाऱ्या दुधाच्या टँकरला जोरदार धडक दिली. गुरुवारी पारगाव येथील आठवडे बाजारला ते तरकारी घेऊन येताना बाजारापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर टुले कुटुंबीयावर काळाने घाला घातला. अपघातानंतर नागरिकांनी जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, कमल टुले यांचा जागीच मृत्यू झाला होता. यात पती, मुलगा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नदीकाठ परिसरात धुक्याची तीव्रता जादा थंडीच्या दिवसामध्ये दाट धुक्याने दृष्यमानता कमी होते. त्यामुळे वाहन चालकास काही मीटर किंवा काही फुटांवरील वाहन दिसणे कठीण होते. त्यामुळे अपघात होत आहेत. शिवाय या ठिकाणी नदी जवळ असल्याने हवेमध्ये नैसर्गिकरित्या आर्द्रता जास्त प्रमाणात तयार होते. त्यामुळे नदी परिसरात सकाळच्या वेळी इतर ठिकाणापेक्षा जास्त प्रमाणात धुके असते.