ठसका (मारुती जैनक ) – फुटला! फुटला!! फुटला!!!..आमच्या महाराज्याचा अर्थकुंभ अखेर फुटला. तेही कालच्या शुभदिनी. गोविंदांनी दहीहंडी फोडावी, तस्सा जुगाडभाईंनी तो फोडला. समस्त प्रजा त्याला अर्थसंकल्प म्हंते; पण आमच्या लेखी तो अर्थकुंभच! त्या कुंभातून अमृताबरोबरच पंचामृत अन् विखाच्याही चिळकांड्या राज्यभर उडाल्या. सागरमंथनातूनही जेवढं अमृत निघालं नाही, तेवढं अमृत या कुंभातून बाहेर पडलं. त्या चिळकांड्या आमच्याही अंगावर आल्या. आधीच सर्दी-पडसं; त्यात या चिळकांड्या. आम्ही आणखीच जाम जाहलो. कुणी पंचामृत-पंचामृत अशा हाकाट्या पिटल्या. तर कुणाच्या पोटात विख गेल्यानं त्यांना पोटशूळ जाहली. एवढ्यावरच शिमगा थांबला नाही. कुंभाला कुणी गाजर हलव्याचा नैवेद्य अर्पण केला. म्हंजे की, त्याला चक्क गाजराच्या हलव्याची उपमा दिली. हा “उपमा’ खाऊन आमच्या नरढ्यातल्या ढेकरांनी कैक डरकाळ्या फोडल्या. गाजराचा हलवा चवीला गोडच ना! मग ह्यांना कुंभाचा गोडवा गायचा व्हता, की कडवा चाखायचा व्हता, हे काय आम्हास उमजले नाही. अर्थात फकस्त विरोधक म्हणूनशानं त्यांनी शब्दच्छल केला. हे आमच्या अल्पबुद्धीलाही चटकन कळलं. खरं तर त्यांनी ह्याला गाजराचा हलवा म्हणण्यापरीस कारल्याचा हलवा अस्सं म्हणायला हवं व्हतं. पण या थोरामोठ्यांना समजंवायचं कस्स? शेवटाला आम्ही पामर ते पामरच! असोत. या कुंभातून अमृत-पंचामृताच्या ज्या चिळकांड्या उडाल्या त्यांनी आम्ही धन्य जाहलो; पण त्याला खरंच अमृत म्हणावं, की अवकाळीचा पाऊस? या सवालानं आमचं डोस्कं चिनभिन जाहलं. कुंभ फोडणाऱ्या या मंडळींना साक्षात हरिश्चंद्रानं दर्शन दिलं की, काय, अस्सं आम्हास वाटलं नसतं तर नवलच! केवढं या कुंभात अमृत!! भलावण-भलावण म्हंजे काय, याचंच उत्तर आम्हास यातून मिळालं. बिच्चारा पोशिंदा तर बायकापोरांसह चेकाळला. रिकामी खिशानंच बहुदा त्यानं दिवाळी साजरी केली असावी. बारमाही दिवाळं भोगणाऱ्या या बापुड्या पोशिंद्याची आम्हास खचितच किव आली. धाय मोकलून रडणाऱ्या लेकराची समजूत काढावी, अस्साच हा खटाटोप असल्याचं आम्हास मनोमन वाटलं. अर्थात कुंभफोड्यांनी एवढा खटाटोप कश्शाला करावा?… याचं उत्तर आम्हास मिळालं ते त्यांच्या विरोधकांकडून. काय तर म्हणे निवडणुका. येणाऱ्या निवडणुका डोळ्याम्होरं ठिऊनच हा सारा खटाटोप करण्यात आलाय. या जवाबानं आम्ही चक्रावलोच. ज्याच्या हाती सत्ता-त्याचाच भत्ता, हेच खरं. या “खरेवाडी’च्या ठेसनावर आमच्या विच्चाराची एक्स्प्रेस आपसूकच विसावली. मग मात्र अर्थकारणाचं अस्सं राजकारण करणाऱ्यांची आम्हास चिड आली. या अर्थाच्या संकल्पाला काहीच अर्थ नाही, अस्सं म्हणूनशानं आम्ही हा विषयच डोस्क्यातून काढून टाकला. अर्थात अर्थकुंभ फोडणाऱ्या मंडळींना दुखवायला नक्को म्हणून आम्ही त्यांना “अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ अस्सं सुनावून गुमान घर गाठलं. त्यांच्या नावात देव अन् देवांचा देव इंद्रही सामावलाय, हे वेगळं सांगायची गरजच नाही.