Thane News : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह ११,००० हून अधिक गुंतवणूकदारांची ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या एका दाम्पत्याला आणि त्यांच्या साथीदाराला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. एका कारवाईत ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा आणि त्यांचा साथीदार अमित पाला यांना गुरुवारी गुजरातमधून अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी २०१९ मध्ये पुण्यात ट्रेड विथ जॅझ नावाची गुंतवणूक कंपनी स्थापन केली होती. या कंपनीने एक योजना सुरू केली होती, ज्यामध्ये महाराष्ट्रातील १,५०० पोलीस कर्मचाऱ्यांसह ११,००० हून अधिक लोकांनी गुंतवणूक केली होती. या तिघांनी शेअर बाजारातील ट्रेडिंग आणि संबंधित व्यवसायांमध्ये दरमहा ४ टक्के परतावा देण्याचे आश्वासन देऊन पीडितांना आकर्षित केले. विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी कंपनी दरमहा जवळपास १० टक्के कमाईचे आमिष दाखवत होती. नंतर कंपनीने अचानक आपली कार्यालये बंद केली आणि गुंतवणूकदारांना प्रतिसाद देणे थांबवले. प्राथमिक तपासानुसार, गुंतवणूकदारांची सुमारे ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये अनेक सरकारी अधिकारी आणि नोकरदारांचा समावेश होता. या तिघांवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखा आरोपींशी संबंधित बँक खाती, आर्थिक कागदपत्रे आणि पैशांच्या व्यवहारांची तपासणी करत आहे. याप्रकरणी आणखी अटक होण्याची शक्यता आहे.