Thalapathy Vijay: ‘काळी पँट, पांढरा शर्ट…’ ; मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आलेल्या विजयच्या लूकचा अर्थ काय?, वाचा
Thalapathy Vijay:

Thalapathy Vijay: थलपथी विजय आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चेन्नई येथील नेहरू स्टेडियममध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल. या विशेष प्रसंगी विजय यांची एक अनोखी शैली पाहायला मिळाली. शपथविधी सोहळ्यासाठी त्यांनी पारंपरिक वेशाऐवजी फॉर्मल लूक निवडला.
राजकारणी सहसा शपथविधी सोहळ्यांमध्ये पारंपरिक धोती आणि शर्ट (वेष्टी) परिधान करतात, पण विजय यांनी आपल्या शपथविधी सोहळ्यासाठी पूर्णपणे वेगळा आणि आधुनिक लूक निवडला. त्यांनी पारंपरिक पोशाखाऐवजी फॉर्मल लूकला पसंती दिली.
पांढरा शर्ट, काळी पँट आणि फॉर्मल शूजमध्ये विजय एखाद्या चित्रपट नायकासारखे दिसत होते. त्यांचा हा आधुनिक लूक तामिळनाडूच्या तरुणांशी जोडले जाण्याच्या आणि बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग असू शकतो.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी धोती आणि शर्ट परिधान करून शपथ
आजपर्यंत तामिळनाडूच्या जवळपास सर्व माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पारंपरिक तामिळ पोशाखाची निवड केली आहे. एम. जी. रामचंद्रन नेहमी त्यांची प्रसिद्ध टोपी, चष्मा आणि पांढरा वेष्टी शर्ट परिधान करत असत. एम. करुणानिधी हे देखील त्यांच्या पिवळ्या शालीसाठी आणि पांढऱ्या पारंपरिक पोशाखासाठी ओळखले जात होते.
पनीरसेल्वम आणि ई. के. पलानीस्वामी यांनीही पांढरे बनियान आणि शर्ट परिधान केले होते. दरम्यान, एम. के. स्टॅलिन यांनीही २०२१ मध्ये पांढरा शर्ट आणि बनियान परिधान करून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
Chennai | Tamilaga Vettri Kazhagam (TVK) Chief C Joseph Vijay took oath as the Chief Minister of Tamil Nadu. pic.twitter.com/Oc1SXM2aA3
— ANI (@ANI) May 10, 2026
विजय यांच्या आधुनिक लूकचे महत्त्व काय आहे?
परंतु विजय यांनी या शपथविधी सोहळ्यासाठी औपचारिक पोशाख परिधान करून ही दशकांहून जुनी परंपरा मोडली आहे. विजय यांचा औपचारिक लूक हा जनतेला असा संदेश देण्याचा प्रयत्न असू शकतो की त्यांचे सरकार आधुनिक पद्धतीने काम करेल.
चेन्नई पोलिसांनी विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली आहे. स्टेडियमच्या आत आणि बाहेर हजारो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
आज ९ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
विजय यांच्यासोबत त्यांच्या पक्षातील नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये थिरू एन. आनंद, सीटीआर निर्मल कुमार, अरुण राज आणि आधव अर्जुन यांचा समावेश आहे. याशिवाय कीर्तना, राजमोहन, व्यंकटरमणन आणि सेंगोत्तैयन यांच्या नावांचाही समावेश आहे. टीव्हीकेच्या आमदार कीर्तना आज विजय यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. २९ वर्षीय कीर्तना या शिवकाशीमधून नवनिर्वाचित आमदार आहेत.
विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूमध्ये १०७ जागा जिंकल्या आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना ११८ आमदारांची आवश्यकता होती. टीव्हीकेला काँग्रेस (5 जागा), सीपीआय (2 जागा), सीपीआय-एम (2 जागा), व्हीसीके (2 जागा) आणि आययूएमएल (2 जागा) यांचा पाठिंबा मिळाला.





