Jana Nayagan Fees: ‘जन नायगन’साठी थलपती विजयची तब्बल 220 कोटींची फी? बॉबी देओल, पूजा हेगडेसह स्टारकास्टच्या मानधनाची चर्चा
Jana Nayagan Fees 'जन नायगन' हा विजयच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. त्यामुळे त्याच्या मानधनाचीही मोठी चर्चा होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ही चर्चा आणखी वाढली आहे.

Jana Nayagan Fees: थलपती विजयचा बहुप्रतिक्षित ‘जन नायगन’ हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून थिएटरबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, चित्रपटाइतकीच त्यातील कलाकारांच्या मानधनाचीही चर्चा रंगली आहे. विविध माध्यमांतील वृत्तांनुसार, थलपती विजयने या चित्रपटासाठी तब्बल 220 ते 275 कोटी रुपये मानधन घेतल्याचा दावा केला जात आहे. ही रक्कम खरी ठरल्यास भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये विजयचे नाव अग्रस्थानी असेल. मात्र, या आकड्याला निर्मात्यांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
‘जन नायगन’ हा विजयच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. त्यामुळे त्याच्या मानधनाचीही मोठी चर्चा होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ही चर्चा आणखी वाढली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन एच. विनोथ यांनी केले आहे. वृत्तांनुसार, या चित्रपटासाठी त्यांना सुमारे 25 कोटी रुपये मानधन मिळाले आहे. अनेक वर्षांच्या तयारीनंतर तयार झालेला हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील मोठा प्रोजेक्ट मानला जातो.
चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. त्यांच्या गाण्यांना आणि पार्श्वसंगीताला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अहवालानुसार, अनिरुद्ध यांनी या चित्रपटासाठी 13 कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जात आहे.

Jana Nayagan Movie
चित्रपटात विजयसोबत अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. विविध वृत्तांनुसार, तिने या चित्रपटासाठी सुमारे 6 कोटी रुपये मानधन घेतले आहे. तर बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. ‘अॅनिमल’ चित्रपटानंतर बॉबी देओलला दक्षिणेतील मोठ्या चित्रपटांच्या ऑफर मिळत असून, ‘जन नायगन’साठी त्याने 5 ते 10 कोटी रुपये मानधन घेतल्याचा दावा केला जात आहे.
याशिवाय चित्रपटातील इतर कलाकारांनाही मोठे मानधन मिळाल्याची चर्चा आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांना सुमारे 5 कोटी रुपये, तर अभिनेत्री प्रियमणी आणि अभिनेते गौतम वासुदेव मेनन यांना प्रत्येकी 3 कोटी रुपये मानधन मिळाल्याचे सांगितले जात आहे. अभिनेता नारायण यांना सुमारे 2.5 कोटी रुपये मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये कलाकारांच्या मानधनाबाबत वेगवेगळे आकडे समोर येत आहेत. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा संबंधित कलाकारांनी या मानधनाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे हे सर्व आकडे केवळ वृत्तांवर आधारित असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, ‘जन नायगन’ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, बॉक्स ऑफिसवरही चित्रपट दमदार कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत चित्रपटाच्या कमाईचे आकडे आणि कलाकारांच्या मानधनाविषयी अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.





