Thaksin Shinawatra : थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांची तुरुंगातून सुटका
थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा (Thaksin Shinawatra) यांना राजघराण्याने माफ केल्याने शिक्षेच्या चार महिने आगोदरच तुरुंगातून मुक्त करण्यात आले.

Thaksin Shinawatra : थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा (Thaksin Shinawatra) यांना राजघराण्याने माफ केल्याने शिक्षेच्या चार महिने आगोदरच तुरुंगातून मुक्त करण्यात आले. जवळपास दोन दशकांपर्यंत थायलंडच्या राजकारणातले मोठे प्रस्थ असलेल्या शिनावात्रा यांना गेल्या महिन्यात पॅरोल मिळाल्याने तुरुंगातून मुक्त केले गेले. समर्थकांनी जल्लोषाने त्यांच्या सुटकेचा आनंद साजरा केला होता.
राजे महा वाजिरालोंगकोर्न यांनी शिनावात्रा यांना दोषमुक्त करण्याचा आदेश मंगळवारी प्रसिद्ध झाला. आज त्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात आली. राणी सुथिदा यांच्या वाढदिवसानिमित्त शिनावात्रा (Thaksin Shinawatra) यांना माफी देण्याचा निर्णय राजघराण्याच्यावतीने घेण्यात आला. थायलंडमध्ये राजेशाही असल्याने दोषींना माफी देऊन तुरुंगातून मुक्त करण्याचे अधिकार राजघराण्याला आहेत.
थायलंडमधील आघाडी सरकारचा भाग असलेल्या फिऊ थाई पार्टीमधून शिनावात्रा पुन्हा राजकारणात सक्रिय होतील असा अंदाज आहे. पण ते आता राजकारणापासून लांब राहू इच्छित असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. थाकसिन (Thaksin Shinawatra) हे दूरसंचार क्षेत्रातील एक मोठे उद्योजक होते. त्यांनी १९९८ मध्ये स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. ते २००१ पासून परदेशात असताना २००६ मध्ये त्यांच्याविरोधात लष्करी उठाव झाला.
या उठावामुळे पदावरून हटवले जाईपर्यंत ते पंतप्रधान म्हणून कायम होते. ते परदेशात असतानाही त्यांच्या प्रभावाखालील राजकीय पक्षांनी थायलंडमध्ये सरकार स्थापन केले होते. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती आणि एक वर्षाची शिक्षा सुनावली गेली होती. त्यापैकी ८ महिन्यांची शिक्षा भोगल्यानंतर ११ मे रोजी त्यांना पॅरोलवर सोडले गेले होते.
याकाळात हालचालींवर देखरेखीसाठी त्यांना इलेक्ट्रॉनिक पट्टी मनगटावर बांधली गेली होती. त्यांची शिक्षा आणखी चार महिन्यांनी संपणार होती. त्यापुर्वीच राजघराण्याने त्यांना मुक्त केले.
भ्रष्टाचाराचे आरोप
आपल्या पदाचा वापर करून स्वतःच्या व्यावसायिक फायद्यासाठी वापर करणे आणि सरकारला तोटा पोहोचवणाऱ्या राज्य लॉटरी प्रकल्पाला बेकायदेशीरपणे मंजुरी देणे या आरोपांखाली दोषी ठरल्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते.
त्यांना मूळतः २०२३ मध्ये आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु राजांनी ती शिक्षा एका वर्षापर्यंत कमी केली आणि वैद्यकीय कारणास्तव त्यांना बँकॉकच्या पोलीस रुग्णालयातील एका सुइटमधून शिक्षा भोगण्याची परवानगी देण्यात आली. पण त्यांना अवाजवी विशेष वागणूक मिळत असल्याच्या निषेधानंतर आंदोलन झाले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२५ मध्ये उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी थाकसिन यांची रवानगी तुरुंगात केली होती.






