बँकॉक : थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांच्यावर राजेशाहीची बदनामी करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोप ठेवल्यानंतर शिनावात्रा यांना लगेच जामीन मंजूरही करण्यात आला आहे. थायलंडमध्ये १८ वर्षांपूर्वी झालेल्या बंडानंतर शिनावात्रा यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले होते. मात्र तरिही ते अजूनही थायलंडच्या राजकारणातील बडे प्रस्थ मानले जातात. आज सकाळी ते स्वतः न्यायालयात हजर झाले आणि त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले. शिनावात्रा यांना पूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली गेली होती. अनेक वर्षे देशाबाहेर राहिल्यानंतर गेल्या वर्षी ते थायलंडला परतले आणि आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी रुग्णालयात राहूनच शिक्षा पूर्ण केली. तेंव्हापासून ते पडद्यामागे राहून सरकारवर नियंत्रण ठेवत आहेत. राजेशाहीवर टीका करणे हा थायलंडमध्ये शिक्षापात्र गुन्हा मानला जाते. या गुन्ह्यासाठी ३ ते १५ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. सरकारी टीकाकारांना शिक्षा देण्यासाठी हा कायदा जागतिक स्तरावर सर्वात कठोर कायद्यांपैकी एक मानला जातो आणि थायलंडमध्ये या कायद्याचा वापर वाढत्या प्रमाणात होतो आहे. पूर्वीही होता राजेशाहीवरील टीकेचा आरोप थाकसिन शिनावात्रा यांच्यावर यापूर्वी २०१६ मध्ये देखील राजेशाहीवर टीका केल्याचा आरोप होता. दक्षिण कोरियामथ्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली होती. त्यानंतर शिक्षा टाळण्यासाठी ते २ वर्षे परागंदा झाले होते. हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका त्यांनी केली होती.