ठाकरेंना धक्का, शिंदेंनाही झळ; भाजपने मोठा डाव टाकला अन् क्षणात राजकारण फिरवलं; ‘या’ दोन जिल्ह्यात मोठी घडामोड

Uddhav Thackeray | Eknath Shinde | येत्या काही दिवसांवर नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून, प्रचार यंत्रणा कामाला लागलेली आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या या निवडणुकीआधी फोडाफोडीच्या राजकारणाची जोरदार चर्चा आहे. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना भाजपने जोरदार धक्का दिला आहे.
ठाकरेसेनेच्या 16 पैकी 11 उमेदवारांनी थेट निवडणुकीतूनच माघार घेतली असून, या राजकीय घडामोडीमुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नगरपंचायत निवडणुकीला आठ दिवस शिल्लक असतानाच रेणापूरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत ११ उमेदवारांनी निवडणूक न लढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या उमेदवारांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रेयत तटस्थ राहणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता रेणापूरची राजकीय समीकरणे बदलली आहेत.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र पक्षातीलच अडथळ्यांमुळे उमेदवारांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी मुख्य लढत होणार होती. मात्र, अचानक ठाकरेंच्या उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे निवडणुकीसाठी नवी रणनिती आखली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पण दुसरीकडे हे उमेदवार छुप्प्या पद्धतीने कोणाला पाठिंबा देणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
शिंदेंनाही धक्का
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी धक्का देणारी घडामोड घडली आहे. भाजपने शिंदे गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार फोडला असून, यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुलंब्रीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिंदेसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंद ढोके यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ढोके यांनी अचानक भूमिका बदलल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : Dharmendra: शर्मिला टागोर यांच्या एका विनंतीवर धर्मेंद्र संपूर्ण रात्र शूटिंग करत राहिले!





