ठाकरे गटाला मुंबईत पुन्हा धक्का; तेजस्वी घोसळकरांचा राजीनामा

Tejasvi Ghosalkar | उत्तर मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सर्व पदांचा राजीनामा त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून राजीनामा दिल्याचं सांगितले जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
तेजस्वी घोसाळकर यांनी विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल अनेक वेळा नाराजी व्यक्त करून सुद्धा पक्षाकडून दखल न घेतल्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
राजीनाम्यात नेमकं काय लिहिले?
तेजस्वी घोसाळकर यांनी दिलेल्या राजीनाम्यात लिहलं आहे, ‘मी तेजस्वी घोसाळकर महिला दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मन:पूर्वक आभार मानते. माझा हा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती.’ दरम्यान, तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर मातोश्री वरून तेजस्वी यांना बोलवण्यात आला असून या सगळ्या संदर्भात माहिती घेतली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हदरम्यान हत्या
घोसाळकर कुटुंबाचे ठाकरे कुटुंबासोबत जवळचे संबंध आहेत. तेजस्वी घोसाळकर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसळकर हे मुंबईतील दहिसर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार राहिले आहेत. 2024 मध्ये बोरीवली परिसरात फेसबुक लाईव्ह सुरु असताना अभिषेक घोसाळकर यांची मॉरीस नरोन्हाने हत्या केली होती. Tejasvi Ghosalkar |
तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी
गेल्या महिन्यामध्ये तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी व्हॉट्सअप ग्रुपवर आलेली होती. तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद’, अशा आशयाचा मेसेज करण्यात आला होता. Tejasvi Ghosalkar |
हेही वाचा:
भाजपची आजपासून देशभरात तिरंगा यात्रा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची सांगणार माहिती





