मुंबई : महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षांची एकत्रित शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी, मतदार यादीतील गोंधळ आणि प्रशासनाच्या पक्षपाती कारभाराबाबत मुद्दे उपस्थित करण्यात आले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतदार यादी आणि बोगस नावावरुन आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर संवाद साधला.बैठक झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र वाय.बी.चव्हाण येथे पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पत्रकार परिषदेत जयंत पाटील, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यातील घोळ आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत, भाजपला सुद्धा आम्ही पत्र दिले होते, पण ते आले नाहीत. काही लोक मतदार याद्यांशी खेळत आहेत आणि हवे ते लोक घुसवत आहेत हे आम्ही सांगितले होते. आयुक्त म्हणून त्यांना अधिकार आहे की ते कटपुतळे आहेत, जे वरून त्यांना कोणी हलवतय, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. मी तर म्हणालो आहे इलेक्शन असे घ्यायचे असेल तर इलेक्शन न घेता सिलेक्शन करून टाका. पण, आम्ही हुकूमशाही सहन करणार नाही. राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला बाप कोण? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत मतदार याद्या सुधारत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असे आम्ही सांगितले आहे, अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली. निवडणूक म्हटले की, राजकिय पक्ष आले, मतदार आले.निवडणूक आयोग हे फक्त निवडणूक घेतात मात्र राजकिय पक्ष ते लढवतात. मात्र राजकिय पक्षांना निवडणूक आयोग यादया दाखवत नसेल तर इकडे घोळ आहे, असे राज ठाकरे म्हणाले. मतदार यादया न दाखवून काय भेटणार आहे? या मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका, असे राज ठाकरेंनी सांगितले. ५ वर्ष निवडणूका झाल्या नाहीत, आणखी ६ महिने नाही झाल्या, तर काय फरक पडतो. उद्या-परवामध्ये काय निर्णय घेतात ते पाहू, नंतर सर्व आम्ही आमचा निर्णय सांगू, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले. मतदारयादी गोपनीय असते की मतदान गोपनीय असतं?, सीसीटिव्ही आहेत ते हे बघु शकतात…मग आम्ही का नाही?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच या निवडणूक आयोगाच्या घोळावर मी 2017 ला ही पत्रकार परिषद घेतली. जिल्हा परिषदेच्या याद्या आल्या 2022 च्या फोटोसकट याद्या आहेत. आताच्या याद्यांमध्ये फोटो नाहीत. 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत, आता आणखी 6 महिने त्या झाल्या नाहीत तर काय फरक पडतो? मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही, राजकीय पक्षाचं समाधान होत नाही तोपर्यत निवडणूका घेऊ नका. पुराव्यासह बोगस मतदारांचा लेखाजोखा मांडला : जयंत पाटील आम्ही राज्याचे निवडणूक आयुक्तांना भेटून निवेदन दिले आहे. मतदार यादीतील अनंत चुका दाखवल्या आहेत. सीओंनी आम्हाला आश्वासन दिले की, केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून दुरुस्त्या केल्या जातील. आम्ही आजही पुन्हा भेट घेतली, काही महत्वाच्या पुरावे सहीत आम्ही माहिती दिली आहे. पुराव्यांसोबत पत्रही दिली, मतदार यादीत मतदारांचे पत्ते चुकीचे आहेत, प्रत्यक्षात मतदार त्या पत्यावर राहात नाहीत.बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार आहे.आम्ही विधानसभेला याद्या वाचल्या, हेच स्थानिक स्वराज्य संस्था निवणुकीत चालू राहिलं तर कठीण आहे. मुदत वाढवून चालणार नाही, मतदार याद्या तपासा. बोगस मतदार काढून टाका. १ जुलैच्या यादीत दुरुस्ती नाही : थोरात आम्ही आधीच सांगितले होते, मतदार याद्यांमध्ये दोष आहे. दोष असताना सुद्धा निवडणूक घेतली गेली, बाहेरून मतदार आले आणि मतदान केले आहे. विधानसभेच्या मतदार यादीमध्ये दोष होते. 1 जुलै रोजी मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केली होती त्यामध्ये कुठलीही दुरुस्ती केली नाही. दोषासहीत आता अंतिम केली आहे, यावर राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांना भेटलो. मात्र, आम्ही जे विचारले त्यावरील उत्तराने आमचे समाधान झालेले नाही, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.