मुंबई – उद्धव ठाकरेंनाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला काही लोक भेटले होते. शरद पवारांना भेटलेली ती माणसं ठाकरेंनाही भेटली होती. तुमच्या ज्या 60 ते 65 जागा अडचणीच्या आहेत त्या सांगा, आम्ही तुम्हाला ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करून देऊ, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला. मुंबई येथे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना शरद पवारांच्या दाव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हा गौप्यस्फोट केला. संजय राऊत म्हणाले, काल शरद पवार यांनी जो विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले आणि 160 जागा मिळवून देतो विशिष्ट रक्कम द्या अशी मागणी केली. आता त्याही पुढे जाऊन मी सांगतो यापैकी काही लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले होते. हे लोक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीलाही भेटले होते. आम्ही त्यांना सांगितले की आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. देशातले वातावरण पाहता लोकसभा आम्ही 100 टक्के जिंकू आणि खरोखर महाराष्ट्रात आम्ही ते यश प्राप्त केले. त्यामुळे निवडणुकीत अशा प्रकारे घोटाळे करून आम्हाला जिंकायची गरज नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते लोक परत आले. आम्ही त्यांना सांगितले की लोकसभेत आमचा विजय झाला आहे. विधानसभेत आम्ही नक्की जिंकू. ते लोक म्हणाले की तुमच्या ज्या 60 ते 65 जागा कठीण वाटत आहेत, त्या सांगा. आम्ही तुम्हाला त्या ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करून देऊ. आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला त्याची गरज वाटत नाही. पण त्यांनी इतकंही सांगितलं की तुम्हाला जरी हे आवश्यक वाटत नाही तरी समोर जे सरकारमध्ये आहे, त्यांनी अशा प्रकारची योजना ईव्हीएमच्या माध्यमातून आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून जे काम केले आहे, त्यामुळे तुमचे अपयश आम्हाला दिसत आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तरी आमचा विश्वास निवडणूक यंत्रणेवर, निवडणूक आयोगावर आणि लोकशाहीवर होता. दुर्दैवाने जे शरद पवार म्हणत आहेत आणि उद्धव ठाकरेंना जी माणसं भेटली त्यांच्या बोलण्यात तथ्य असावे असे दिसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.