प्रभात वृत्तसेवा सातारा – यावर्षीची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी सातारा शहरातील 31 केंद्रांवर झाली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 11 हजार 971 परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 11 हजार 202 शिक्षक उपस्थित होते. 769 शिक्षकांनी परीक्षेस दांडी मारली. कॅमेर्यांच्या निगराणीखाली परीक्षा झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे फेस रेकग्निशन आणि बायोमेट्रिक तपासणी करण्यात आली. चेहरा किमान 50 टक्के जुळणे बंधनकारक होते. सकाळी 10.30 वाजता पहिला पेपर सुरू होणार असल्याने, परीक्षार्थी एक तास आधी केंद्रावर हजर होते. वेळेनंतर येणार्या शिक्षकांना परीक्षेपासून मुकावे लागले. दुसरा पेपर दुपारी 2.30 वाजता सुरु झाला. पहिल्या पेपरसाठी 4 हजार 945 जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 4 हजार 617 हजार होते, तर 328 जणांनी दांडी मारली. दुसर्या पेपरसाठी 7 हजार 26 परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6 हजार 585 जण हजार होते, तर 441 जणांनी दांडी मारली.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी अंनिस नायकवडी, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी धनंयज चोपडे, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे आणि अधिकार्यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. संशयास्पद हालचालींची रिअल टाइम नोंद जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा अर्ज वाढले असून, अधिक परीक्षार्थ्यांचा ताण सांभाळण्यासाठी, प्रत्येक केंद्रावर अतिरिक्त समवेक्षक नेमण्यात आले होते. प्रत्येक वर्गात 24 विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या निगराणीखाली परीक्षा दिली. उपग्रह फोन, हॉटलाइन आणि व्हॉइस अलर्टद्वारे राज्य परीक्षा परिषदेचे अधिकारी सातत्याने संपर्कात होते. संशयास्पद हालचालींची नोंद रिअल टाइम घेतली जात होती. जिल्हा परिषदेतील नियंत्रण कक्षातून सर्व केंद्रांवर देखरेख ठेवण्यात आल्याचे अनिस नायकवडी यांनी सांगितले.