ढाका – कोविड विरोधी औषध जेंव्हा केंव्हा उपलब्ध होईल, तेंव्हा ते बांगलादेशातील नागरिकांसाठीही आवश्यक असेल. मात्र चिनी औषधासाठीच्या चाचण्यांना बांगलादेशात प्राधान्य दिले जाणार नाही, असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव अब्दुल मन्नान यांनी सांगितले.
या औषधाच्या उपलब्धतेसाठी गवी फाऊंडेशनसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांशी बांगलादेश सरकार संपर्कात आहे, असे त्यांनी सांगितले. या औषध निर्मिती करणाऱ्या संस्थेबरोबर सप्टेंबरमध्ये पुढील चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऑक्सफर्ड, अमेरिका आणि युरोपमध्ये इतर चाचण्या यशस्वी झाल्यास आणि या चाचण्यांचे सकारात्मक निकाल मिळाल्यास बांगलादेशला लवकरात लवकर आपल्या लोकांसाठी लस घ्यावीशी वाटेल, असेही त्यांनी सांगितले.
मात्र चीनी लसीसाठी मानवी चाचणीची परवानगी केवळ एपिडेमिओलॉजी रोग नियंत्रण व संशोधन संस्थेला या लसीच्या क्षमतेबद्दल विश्वास वाटल्यानंतरच दिली जाईल. अन्यथा परवानगी दिली जाणार नाही, असे चीनी सिनोव्हॅक बायोटेक कंपनीने लसीची मानवी चाचणी घेण्याबद्दल केलेल्या विनंतीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले.
जरी आता चिनी लसीची चाचणी सुरू झाली असली तरी निकाल मिळण्यास किमान सहा महिने लागतील. अशावेळी बांगलादेशने फक्त सिनोव्हॅक बायोटेकवर अवलंबून का राहावे, असे मन्नान म्हणाले.