मुंबई : जगप्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे भारतातील पहिले शोरूम मुंबईच्या बीकेसी परिसरात नुकतेच खुले झाले. यानंतर देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याचा मान शिवसेना (शिंदे गट) नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पटकावला. टेस्लाची इलेक्ट्रिक Model Y कार खरेदी करताना कोणतीही सवलत न घेता पूर्ण किंमत भरल्याचे सरनाईक यांनी सांगितले. ही कार त्यांनी आपल्या नातवाला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून तो शाळेत ही कार वापरून पर्यावरणपूरक वाहनांचा संदेश पसरवेल. मुख्यमंत्र्यांकडून शोरूमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्लाच्या मुंबईतील शोरूमचे उद्घाटन केले. “देशातील पहिली टेस्ला कार महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्याच्या मालकीची आहे, याचा मला अभिमान आहे. ही कार माझ्या नातवाला भेट देत आहे, ज्यामुळे तो शाळेत ही कार वापरेल आणि इतर मुलांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांबाबत जनजागृती होईल,” असे सरनाईक म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. अटल सेतू आणि समृद्धी महामार्गासह विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांना सवलती दिल्या जात आहेत. “पुढील दहा वर्षांत इलेक्ट्रिक वाहने राज्यात क्रांती घडवतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टेस्ला Model Y ची वैशिष्ट्ये किंमत : Model Y RWD ची किंमत ₹61.07 लाख, तर LR RWD ची किंमत ₹69.15 लाख आहे. अतिरिक्त रंगासाठी जादा शुल्क आकारले जाते. कार्यक्षमता : Model Y RWD अवघ्या 5.6 सेकंदात 0 ते 100 किमी/तास वेग गाठते. स्टँडर्ड RWD एकदा चार्ज केल्यानंतर 500 किमी, तर LR RWD 622 किमी अंतर कापू शकते. नवीन वैशिष्ट्ये : मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल फंक्शन यासारखे बदल नवीन मॉडेलमध्ये समाविष्ट आहेत. स्पर्धा : ही कार BMW X1 LWB, Volvo C40, BYD Sealion 7 आणि Mercedes-Benz EQA यांच्याशी स्पर्धा करेल. पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन टेस्लाची ही कार पूर्णपणे आयात (CBU) स्वरूपात भारतात आणली गेल्याने तिची किंमत जास्त आहे. तरीही, सरनाईक यांनी पर्यावरणपूरक वाहनांचा प्रसार करण्यासाठी ही खरेदी केल्याचे सांगितले. “पंतप्रधानांच्या इच्छेनुसार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे सरनाईक यांनी नमूद केले. टेस्लाच्या भारतातील पहिल्या कारच्या खरेदीने पर्यावरणपूरक वाहनांच्या वापराला चालना मिळण्याची अपेक्षा आहे, आणि सरनाईक यांच्या या पुढाकाराचे सर्वत्र स्वागत होत आहे.