Terrorists Killed : भारतीय सुरक्षा दलांनी रविवारी २ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा (Terrorists Killed) केला. ती महत्वपूर्ण घडामोड जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात घडली. जम्मू विभागातील किश्तवाडच्या दुर्गम भागात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी संयुक्त मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी पहाटेच्या सुमारास सुरक्षा जवान आणि दहशतवादी आमनेसामने आले. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये काही काळ चकमक झडली. त्यामध्ये २ दहशतवादी मारले गेले. ते पाकिस्तानी नागरिक असल्याचे उघड झाले. दोन्ही दहशतवादी पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद संघटनेसाठी सक्रिय होते. चकमकस्थळावरून दहशतवाद्यांकडील शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला. त्यामध्ये २ एके-४७ रायफलींचाही समावेश आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांचे काही साथीदार संबंधित परिसरात दडले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा दलांची शोधमोहीम आणखी काही दिवस चालू शकते. नववर्षात आतापर्यंत जम्मू विभागात विविध चकमकी झडल्या. त्यामध्ये मिळून जैशचे ६ दहशतवादी मारले गेले. त्यामुळे सुरक्षा दलांच्या धडक मोहिमा जैशला मोठा हादरा देणाऱ्या ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.