दहशतवाद्यांनीच केली आपल्या 12 दहशतवादी साथीदारांची हत्या
Updated On:

काबुल – अफगाणिस्तानात दोन दहशतवाद्यांनी आपल्या अन्य 12 साथीदारांची हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. पश्चिम हेरात प्रांतात हा प्रकार घडला.
हेरात प्रांताच्या पोलिस दलाचे प्रवक्ते अब्दुल अहमद वलिजादा यांनी सांगितले की या दोन गनिमांनी 12 गनिमांच्या हत्येनंतर त्यांची शस्त्रे घेऊन तेथून पळ काढला आहे.
आमच्याच दहशतवाद्यांनी या दहशतवाद्यांची हत्या केल्याच्या वृत्ताला तालिबानचे प्रवक्ते युसुफ अहमदी यांनी दुजोरा दिला आहे. या प्रांतावर आता सरकारी फौजांनी नियंत्रण मिळवले आहे.
गेले काहीं दिवस या प्रांतावर तालिबानी गनिमांचा कब्जा होता. दरम्यान आज काबुलच्या पश्चिम भागात पोलिसांच्या एका वाहनावर तालिबान्यांनी बॉम्ब फेक केली. त्यात दोन पोलिस मरण पावले तर अन्य एक जण जखमी झाला आहे.





