तेल अवीव – इस्रायलमधील तेल अवीवमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. एका दहशतवाद्याने चाकू हल्ला करून चार जणांना जखमी केले आहे. पोलिसांनी हा दहशतवादी हल्लाच असल्याचे प्राथमिक तपासानंतर म्हटले आहे. हल्लेखोराने नहलात बिन्यामिन स्ट्रीटवर तीन जणांवर चाकूने वार केले आणि त्यानंतर जवळच्या ग्रुझेनबर्ग स्ट्रीटवर चौथ्या व्यक्तीवर हल्ला केला.
इस्रायली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्ला करणारा दहशतवादी अब्देल अझीझ कद्दी हा मोरोक्कन नागरिक आहे. त्याच्याकडून एक अमेरिकन ग्रीन कार्डही जप्त करण्यात आले आहे. इस्रायली पोलिसांनी दहशतवाद्याला ठार मारले आहे. हल्लेखोराकडून एक ओळखपत्रही जप्त करण्यात आले आहे. तो १८ जानेवारी रोजी पर्यटन व्हिसावर इस्रायलला आला होता.
टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, सुरक्षा एजन्सी शिन बेटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादी अब्देल अजीजला इस्रायलमध्ये प्रवेश करताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रोखले होते, परंतु नंतर त्याला प्रवेशाची परवानगी देण्यात आली. इस्रायलमध्ये तीन दिवसांत झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या ४ जणांचे वय २४ ते ५९ वर्षांच्या दरम्यान आहे.
हल्लेखोराने प्रथम तीन जणांवर चाकूने वार केले. घटनेनंतर गोंधळ उडाला आणि लोक पळून जाऊ लागले. दहशतवाद्याने पळून जाणाऱ्या लोकांवर हल्ला केला आणि एका व्यक्तीवर चाकूने वार केले. अशाप्रकारे या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. इस्रायली पोलिसांनी दहशतवाद्याला ठार मारले आहे.