जम्मू-काश्मिरात लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला; 5 जवान जखमी

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्गमध्ये एलओसीजवळ दहशतवाद्यांनी गुरुवारी संध्याकाळी पुन्हा एकदा लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. या घटनेत 5 जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे.
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील बटगुंडमध्ये दहशतवाद्यांनी आज सकाळी आणखी एका मजुरावर गोळीबार केला होता, ज्यात तो जखमी झाला होता. जखमी शुभम कुमार हा यूपीचा रहिवासी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचवेळी गुरुवारी सकाळीच श्रीनगरमधील गनबाग परिसरात एका गैर-काश्मीरी तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत एमडी जाहूद हा पश्चिम बंगालचा रहिवासी होता.
दरम्यान, आठवडाभरात जम्मू-काश्मीरमध्ये गैर-काश्मिरींवर झालेला हा तिसरा हल्ला आहे. यापूर्वी 20 ऑक्टोबरला गांदरबल आणि 18 ऑक्टोबरला शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग केली होती, ज्यात 7 लोक मारले गेले होते. सातत्याने होत असलेले दहशतवादी हल्ले पाहता आज राजभवनात उच्चस्तरीय बैठकही झाली. त्यात उत्तर विभागाचे कमांडर, जम्मू-काश्मीरचे डीजीपी, कॉर्प्स कमांडर आणि गुप्तचर संस्थांचे अधिकारी सहभागी झाले होते.





