Kulgam Attack : कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला ! माजी सैनिक शहीद, पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात एक माजी सैनिक शहीद झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,माजी सैनिक मंजूर अहमद हे दक्षिण काश्मीरमधील कुलगाममधील बेहीबाग गावात पत्नी आणि मुलीबरोबर वास्तव्यास होते. त्यांच्यावर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार करत हल्ला केला.
यात मंजूर अहमद यांच्या पोटात एक गोळी लागली. त्यामुळे या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला, तर या हल्ल्यात त्यांची पत्नी आणि मुलीच्या पायालाही एक गोळी लागली आणि त्या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांची पत्नी आणि मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर लगेचच घटनास्थळी पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान आणि लष्कराच्या संयुक्त पथक घटनास्थळी पोहोचले आहे. तसेच ही घटना ज्या ठिकाणी घडली तेथील परिसराला पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवानांनी वेढा घातला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरु करण्यात आले आहे.





