जामखेड : जामखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ची धामधूम सुरू असून २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर शहरातील काही प्रभागांत स्थानिक गुंडांकडून भीतीचं वातावरण निर्माण होत असल्याची माहिती पुढे येत आहे. गाड्या फोडणे, फ्लेक्स फाडणे, कार्यकर्त्यांना धमकावणे असे प्रकार सुरू झाल्याने मतदारांमध्ये दहशत निर्माण होत असून त्याचा थेट परिणाम मतदान प्रक्रियेवर होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक घारगे यांना पत्राद्वारे त्वरीत आणि भक्कम पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शहरात पुरेसा पोलीसबळ तैनात करून गुंड प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यात यावा, असंही त्यांनी पत्रात स्पष्ट केलं आहे. जामखेड नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्यात असून उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. निवडणूक शांततापूर्ण, स्वच्छ व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी संवेदनशील मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्याचीही मागणी आमदार पवार यांनी केली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आवश्यक ती पावलं उचलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणूक अवघ्या काही तासांवर असताना वाढत्या तणावामुळे जनतेत चिंता पसरली आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून भीतीचे सावट दूर करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.