Pakistan – इम्रान खान यांच्या भगिनी अलिमा खान यांच्यावरील दहशतवादाचे आरोप रद्द करण्यास पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने आज नकार दिला. आलिमा खान यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने काल फेटाळून लावली. नोव्हेंबर २०२४ मध्ये पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या आंदोलनात आलिमा खान सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर अलिमा आणि अन्य ११ जणांविरोधात रावळपिंडीतील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि दहशतवादाचे आरोप ठेवण्यात आले होते. बेकायदेशीरपणे आंदोलन करणे, सरकारविरोधी घोषणाबाजी, तोडफोड आणि दगडफेक करण्याचे आरोप त्यांच्यावर ठेवले गेले होते. या आरोपातून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका अलिमा खान यांनी दहशतवाद विरोधी न्यायालयात दाखल केली होती. मात्र हे आरोप योग्य असल्याचे सांगून न्यायालयाने ही याचिका सोमवारी फेटाळून लावली. या खटल्याच्या सुनावणीला अलिमा अनेकदा गैरहजर राहिल्या आहेत. सरतेशेवटी न्यायालयाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आणि तब्बल ११ वेळा अटक वॉरंट बजावल्यानंतर २० नोव्हेंबरला त्या सुनावणीला उपस्थित राहिल्या होत्या.