पुणे : शहराच्या मांजरी बुद्रुक रेल्वे स्थानकाजवळील गोपाळपट्टी परिसरात रविवारी (१६ नोव्हेंबर) रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास भयंकर रेल्वे अपघात घडला. पुणे-दौंड डेमू पॅसेंजर ट्रेनने रेल्वे रुळावर असलेल्या तीन तरुणांना जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, मृतदेहाचे अवयव विखुरले गेले. मृत्यू झालेल्या तरुणांची नावे प्रथमेश नितीन तिंडे (१८, काळेपडळ, हडपसर), तन्मय महेंद्र तुपे (१८, विशाल कॉलनी, गोपाळपट्टी, हडपसर) आणि तुषार शिंदे (१९, गोपाळपट्टी, हडपसर) अशी आहेत. हे तिघेही हडपसर भागातील स्थानिक राहणारे होते. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी एकूण पाच जण रेल्वे रुळावर एकत्र होते. ट्रेनच्या धडकेत तिघांना जीव गमावावा लागला, तर उरलेले दोन जण घाबरून घटनास्थळावरून पळून गेले. अपघाताची माहिती मिळताच हडपसर आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. हे तरुण रेल्वे रुळावर नेमके कशासाठी गेले होते, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. अपघाताची नोंद हडपसर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली असून, दोन साक्षीदारांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मृत तरुणांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून, या तरुणांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.