जवळके घाटात डंपरचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू

मंचर : खेड तालुक्यातील जवळके येथून गावडेवाडी, तालुका आंबेगाव येथील घाटात खडी वाहतूक करणाऱ्या दहा टायर डंपरचा (MH 04 JK 7521) मंगळवारी (3 जून 2025) दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात डंपरचालक अजय राजू मिर (वय 21, मूळ रा. अंकलाव, गुजरात, सध्या रा. नागापूर, ता. आंबेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर रुपेश भाऊसाहेब इंदोरे (वय 41, रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव) आणि शेख बशीर नवाब (वय 50, रा. मंचर, ता. आंबेगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात घाटात डंपर दुरुस्ती करून गावडेवाडीकडे जात असताना घडला. मंचर येथील फिटर शेख बशीर नवाब डंपर दुरुस्तीसाठी गेले होते. दुरुस्तीनंतर अजय मिर डंपर चालवत असताना, त्याच्यासोबत रुपेश इंदोरे आणि शेख नवाब बसले होते. अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, आणि डंपर रस्त्याच्या कडेला 5-6 पलटी मारून 50 फूट खोल दरीत कोसळला. यात अजय मिर यांचा जागीच मृत्यू झाला.
मंचर येथील दोन क्रेनच्या साहाय्याने डंपर बाहेर काढण्यात आला. मयत अजय मिर हे नागापूर येथे राहत होते आणि लाल गायांचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ड्रायव्हिंगचे कामही ते करत होते. त्यांच्या मागे आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी आणि पत्नी असा परिवार आहे. महिन्याभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





