राजस्थान : राजस्थानच्या सीकरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये सीकर जिल्ह्याच्या लक्ष्मण गढ परिसरात प्रवाशांनी भरलेली एक प्रायव्हेट बस अनियंत्रित झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण गंभीर झाले आहेत. या घटनेत बस पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. काय घडले नेमके? सीकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. प्रत्यक्षदर्शीने या अपघाताबाबत बोलताना सांगितलं की, बर प्रचंड वेगात होती, अचानक अनियंत्रित झाली आणि पुलाच्या भिंतीला जाऊन धडकली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या अपघातामध्ये दाहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये बसचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.