समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

वाशिम : आज सगळीकडे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे राज्यातून अपघाताची घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. वाशिमच्या मालेगांव ते शेलु बाजार दरम्यान च्या समृद्धी महामार्गावर नागपूरच्या लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
काय घडले नेमके?
वाशिमच्या मालेगांव ते शेलु बाजार दरम्यान च्या समृद्धी महामार्गावर नागपूरच्या लेनवर हा भीषण अपघात झाला. या अपघातात पराग सोनार (वय 44 वर्षे) आणि त्यांच्या अनुष सोनार ( वय 7 वर्षे ) वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर पत्नी दीपाली सोनार (वय 40 वर्षे) आणि मुलगी ऋजुल सोनार (वय 17 वर्षे) तसेच आणखी एक मुलगा जखमी झाला आहे.
सोनार कुटुंबीय नवी मुंबई वरून वर्धा इथं जात असतांना हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. यामध्ये कारचालक पराग सोनार आणि त्यांचा मुलगा अनुष सोनार याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना उपचारासाठी अकोला इथं पाठवण्यात आलं आहे. एकाच कुटुंबातील कर्ता पुरुष आणि एक लहान मुलाचा मृत्यू झाल्यानं सोनार कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.





