लोणावळा – लोणावळा-खंडाळा परिसरात फिरण्यासाठी आलेल्या गोव्यातील दोन तरुणांचा कार व टेम्पोच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. ६) पहाटे साडेसहाच्या सुमारास टायगर-लायन्स पॉईंटजवळील शिवलिंग पॉईंट परिसरात घडला. दर्शन शंकर सुतार (वय २१) व मयुर वेंगुर्लेकर (वय २४, दोघेही रा. म्हापसा, गोवा) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर टेम्पो चालक भिमा विटेकर (वय ६०, रा. वाकसई, लोणावळा) जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण आपल्या मित्रांसोबत लोणावळ्यात आले होते. शनिवारी सकाळी ते कारने (जीए ०३ एएम ०८८५) टायगर-लायन्स पॉईंटकडे जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोला (एमएच १४ जेएल ५५२५) भरधाव कारची जोरदार धडक बसली. धडकेचा जोर इतका होता की कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमी टेम्पो चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मृतदेह बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.