कुर्ल्यात भीषण अपघात ! भरधाव बसने पादचाऱ्यांना चिरडलं ; पाच जणांचा मृत्यू, तर 30 ते 35 जण गंभीर जखमी

Kurla Bus Accident । मुंबईतील कुर्लामध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. कुर्ल्यात बेस्ट बसने अनेक पादचाऱ्यांना उडवले. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगाने शिरलेल्या बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. या अपघातात 26 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बेस्ट बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
कुर्ला अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती. त्यावेळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झालेले. बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
आतापर्यंत अपघातात ५ जणांचा मृत्यू Kurla Bus Accident ।
कुर्ला येथील बेस्ट बस अपघातात आतापर्यंत मृतांचा आकडा 5 झाला आहे. तर जखमी 26 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजय विष्णू गायकवाड(70), आफ्रीन अब्दुल सलीम शहा(19), अनम शेख(20), कणीस फातिमा गुलाम कादरी(55), शिवम कश्यप(18) अशी मृतांची नावं आहेत. ज्यावेळी हा अपघात घडला, त्यावेळी अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचं पोलिसांनी सांगितले.
चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल Kurla Bus Accident ।
कुर्ला येथील बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरे (54) या बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलीस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे.





