जालना : पंढरपूर येथून दर्शन घेऊन आलेल्या भाविकांना राजूरकडे घेऊन जाणाऱ्या काळीपिवळी जीप विहिरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास राजूररोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ घडली. या भीषण अपघातात किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जखमींना जालन्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र राजूर परिसरातील चनेगाव येथील काही भाविक पंढरपूर येथे गेले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन हे भाविक गुरुवारी जालन्यात पोहोचले. राजूर येथे जाण्यासाठी हे भाविक काळीपिवळी जीपमध्ये बसले. या जीपमध्ये १५ ते २० प्रवासी होते. दरम्यान, जीप राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळील खडेश्वर बाबा मंदिर ते वसंत नगर येथे आल्यानंतर गाडीचा ब्रेक फेल झाल्याने ही काळी-पिवळी जीप रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. या विहीरीला कठडे नसल्याने जीप थेट विहिरीत पडली. जीप कोसळल्याची माहिती मिळताच काही ग्रामस्थांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु करत दहा प्रवाशांना विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित तीन जणांना जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.