कापुरहोळ येथे भीषण अपघात: लक्झरी बस-कंटेनर धडकेत अनेक प्रवासी जखमी

भोर : भोर तालुक्यातील कापुरहोळ गावाजवळ बेंगळुरू-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (ता. 14) पहाटे 5:30 वाजता भीषण अपघात झाला. बेंगळुरहून मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसने (क्रमांक: जेएन 03 व्ही 2281) कंटेनरला (क्रमांक: एनएल 01 एसी 2517) पाठीमागून जोरदार धडक दिली. यात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले, तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचालक सैदआप्पा महादेव वटकर (वय 26, रा. विजापूर, कर्नाटक) याने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवल्याने हा अपघात घडला. भोर फाट्यानजीक ओव्हरब्रिजनंतर ही धडक झाली. जखमींमध्ये कर्नाटक, कोल्हापूर, मुंबई आणि उत्तर प्रदेशातील प्रवाशांचा समावेश आहे. यात संदीप चिलकवाड, विजय नाडीगेर, महमद खान, प्रकाश जैन, ढाक्या नाईक, श्रावण कांबळे, सुहास वजिरे, जुबेर महमद, अन्नपुर्णा व सिंधु बडीगेर, इब्राहीम वंरी, यशवंत गौडापाटील, महमद चौहान, प्रशांती व सचिन गावडा यांना किरकोळ ते गंभीर दुखापती झाल्या.
अपघातामुळे बसचा पुढील भाग आणि कंटेनरचा मागील भाग चकनाचूर झाला. स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले, तर भोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद घेऊन तपास सुरू आहे. यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
हा अपघात महामार्गावरील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित करतो. भरधाव वेग आणि बेफिकीर वाहनचालनामुळे अशा दुर्घटना घडत असून, प्रशासनाने कठोर उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

