काबूल : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमेवरील तणाव वाढत असून आता अफगाणिस्तानने पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या नद्यांचे पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानला पश्चिमेकडून येणाऱ्या नद्यांचे पाणी मिळू शकणार नाही. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातून जाणाऱ्या कुनार नदीचे पात्र दुसरीकडे वळवण्याचे तालिबानी प्रशासनाने ठरवले आहे. ही नदी सीमा ओलांडून पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात जाते. तेथील सिंचन प्रकल्प प्रामुख्याने याच नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. नदीचे पात्र दुसरीकडे वळवल्यामुळे पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी लक्षणीयरितीने कमी होणार आहे. पाकिस्तानच्या पश्चिमेकडील सिंधू नदीचा पाणी वाटप करार भारताने यापुर्वीच स्थगित केला आहे. आता पश्चिमेकडील कुनार नदीचे पाणीही तालिबानने दुसरीकडे वळवल्यास पाकिस्तानमध्ये दोन्ही दिशांनी मिळणारे पाणी कमी होणार आहे. आर्थिक आयोगाच्या तांत्रिक कमिटीच्या बैठकीमध्ये कुनार नदीचे पाणी नांगरहार प्रांतातील दारुंता धरणाच्या दिशेने वळवण्याचा प्रस्ताव चर्चेनंतर मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी आर्थिक आयोगाकडे पाठवून देण्यात आला. या प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतातील मोठ्या शेतजमिनीला सिंचनासाठीच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. पण पाकमधील खैबर पख्तुनख्वा प्रांताला पाणी मिळू शकणार नाही. पाकिस्तानसाठी कुनार नदीचे महत्व कुनार नदीचा उगम पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात चित्राल जिल्ह्यातल्या हिंदू कुश पर्वतरांगांमधून होतो. तेथून ही नदी दक्षिणेकडे अफगाणिस्तानच्या हद्दीत कुनार आणि नांगरहार प्रांतांमध्ये जाते. तेथून काबूल नदीला जाऊन मिळते. हा प्रवाह सुमारे ५०० किलोमीटरचा आहे. पाकिस्तानच्या पेच आणि कुनार नदीच्या उपनद्या पुन्हा पूर्वेकडे वळून पाकिस्तानात येतात आणि पंजाब प्रांतातील अटक जवळ सिंधू नदीला सामील होतात. या नद्या पाकिस्तानच्या सिंचन प्रकल्पांसाठीच्या महत्वाच्या नद्या आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबर जलविद्युत प्रकल्पही या पाण्यावर चालतात.