सेऊल : दक्षिण आणि उत्तर कोरियामध्ये तणाव वाढला असून दक्षिण कोरियाच्या सीमेवरील सैनिकांनी उत्तर कोरियाच्या सैन्यासाठी इशाऱ्याच्या फैरी झाडल्या आहेत. उत्तर कोरियाच्या सैनिकांनी सीमा ओलांडून दक्षिण कोरियाच्या हद्दीमध्ये प्रवेश केल्यानंतर हा प्रकार घडला. गेल्या महिन्याभरात उत्तर कोरियाच्या सैनिकांकडून दुसऱ्यांदा अशी घुसखोरी झाली आहे. दोन्ही देशांच्या सीमांदरम्यानच्या निर्मनुष्य क्षेत्रात उत्तर कोरियाचे सुमारे २० ते ५० सैनिक काही बांधकाम करत होते, असे दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफनी म्हटले आहे. दक्षिण कोरियाच्या सैनिकांकडून इशाऱ्याचे संदेश आणि हवेतील गोळीबार केल्यानंतर उत्र कोरियाच्या सैनिकांकडूनही प्रत्युत्तर दिले गेले. मात्र त्यानंतर या क्षेत्रामध्ये उत्तर कोरियाच्या सैनिकांच्या कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्या नाहीत. हा परिसर घनदाट जंगलाचा असल्यामुळे सीमा कोठे संपते, हे उत्तर कोरियाच्या सैनिकांना समजले नसावे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही कोरियामध्ये शीत युद्ध सुरू आहे. बलून प्रकरणानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.