सेऊल – उत्तर कोरियाने आज दक्षिण कोरियाच्या दिशेने समुद्रात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जेएई-म्युंग चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. उत्तर कोरियाच्या अणू कार्यक्रमासंदर्भात ते चीनच्या नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. ते चीनला रवाना होण्यापुर्वीच उत्तर कोरियाच्या राजधानीतून ही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या क्षेपणास्त्रांनी तब्बल ९०० किलोमीटरचा प्रवास केला आणि समुद्रात कोसळली. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेचे तज्ज्ञ या क्षेपणास्त्रांच्या मारक क्षमतेचा अभ्यास करत आहेत. उत्तर कोरियाच्या कोणत्याही चिथावणीखोर कृत्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी दक्षिण कोरियाने ठेवली आहे. तसेच या क्षेपणास्त्रांच्या माऱ्याबद्दल जपान आणि अमेरिकेलाही माहिती दिली जात आहे, असे दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफनी म्हटले आहे. एकूण दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत, असे जपानचे संरक्षण मंत्री शिन्जिरो कोइझुमी यांनी सांगितले. उत्तर कोरियाच्या सत्तारुढ वर्कर्स पार्टीचे अधिवेशन लवकरच होणार आहे. दर पाच वर्षांनी होणाऱ्या या या अधिवेशनात उत्तर कोरियाच्या संरक्षण सिद्धतेचा आढावा घेतला जाणार असून यावेळी अमेरिकेबाबतचे नवीन धोरण देखील निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. त्यापुर्वी शक्तिप्रदर्शन म्हणून उत्तर कोरिया आपले लष्करी सामर्थ्य वाढवत असून वेळोवेळी या सामर्थ्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शन केले जाते आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जेई म्युंग हे आपल्या चार दिवसांच्या दौऱ्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी ;र्चा करणार आहेत. चीन हा उत्तर कोरियाचा मित्र देश असून सर्वात मोठा व्यापारी भागीदार देखील आहे. कोरियाद्विपसमूहामध्ये शांतता राखण्यासाठी सकारात्मक भूमिका बजावावी, अशी विनंती ली जेई म्युंग हे शी जिनपिंग यांना करणार आहेत.