सेऊल: उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर उत्तर कोरियाने नव्याने लाऊडस्पीकर लावायला सुरुवात केली आहे. उत्तर कोरियाने पूर्वी लावलेले लाऊडस्पीकर दक्षिण कोरियाच्या लष्करी अधिकाऱ्यांबरोबर 2018 मध्ये झालेल्या करारानुसार काढून टाकले होते.
मात्र, आता हे लाऊडस्पीकर नव्याने लावायला सुरुवात केली गेली असल्यामुळे दोन्ही कोरिया दरम्यान नव्याने तणाव वाढण्याचे संकेत आता मिळायला लागले आहेत. शून्य सैन्य प्रदेशामध्ये उत्तर कोरियाकडून लाऊडस्पीकर लावले गेले असल्याचे निदर्शनास आल्याचे योन्हाप वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
एकूण 10 पेक्षा अधिक ठिकाणी असे लाऊडस्पीकर एकाचवेळी लावले गेलेले बघितले गेले आहे. उत्तर कोरियाकडून मानसिक दबाव आणण्याच्या तंत्राकडे बारकाईने बघत आहोत. कोणत्याही घटनेला सामोरे जाण्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे, असे दक्षिण कोरियाच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफच्या लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
दक्षिण कोरियानेही सीमा भागात नव्याने लाऊडस्पीकर लावण्याचा फेरआढावा घ्यायला सुरुवात केली आहे. सुमारे 40 ठिकाणच्या या लाऊडस्पीकरच्या ब्रॉडकास्ट उपकरणांना हटवायला दक्षिण कोरियाने सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने कासोंग गावाजवळील एक संपर्क केंद्रही उडवून दिले होते. उत्तर कोरियातील काही बंडखोर दक्षिण कोरियातून पत्रकबाजी करत असल्याच्या निषेधार्थ उत्तर कोरियाने हे पाऊल उचलले होते.