Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या भूमिकेमुळे महायुतीत तणाव! थेट काँग्रेससोबत हातमिळवणी, नेमकं घडलं काय?
Maharashtra Politics : या घडामोडींमुळे भाजपमध्येही नाराजी असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणावरून भाजपने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पाटील यांनी काँग्रेस नेत्यांसोबत हातमिळणी केल्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची नांदीची शक्यता आहे.
या घडामोडींमुळे भाजपमध्येही नाराजी असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणावरून भाजपने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नेमकं काय घडलं?
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यानंतर दोघेही लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. याच ठिकाणी बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचे चुलत बंधू अविनाश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
या घडामोडीनंतर बाबासाहेब पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विकासाच्या मुद्द्यावर आपण यापूर्वीही एकत्र होतो आणि आताही एकत्र आहोत, असे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे काय प्रतिक्रिया देतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीत दोन गट पडल्याची चर्चा
बाबासाहेब पाटील यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन वेगळे गट पडल्याचा आरोप होत आहे. एका बाजूला काँग्रेससोबत स्थानिक पातळीवर समन्वय साधला जात असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे महायुतीसोबतची राजकीय बांधिलकी कायम असल्याचे सांगितले जात आहे.
या परस्परविरोधी भूमिकांमुळे महायुतीतील नेत्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्थानिक राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरणार असून, काँग्रेस आणि महायुती यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आता या निवडणुकीत बाबासाहेब पाटील यांची भूमिका कायम राहते का, भाजप यावर काय निर्णय घेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते या घडामोडींवर काय भूमिका मांडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





