Farmer Protest : शंभू सीमेवर पुन्हा तणाव ! शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

नवी दिल्ली : किमान आधारभूत किमतीसह इतर अनेक मागण्यांसाठी शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीला जाण्यावर ठाम आहेत. मात्र, मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना अद्याप चर्चेसाठी पाचारण करण्यात आलेले नाही. दरम्यान, शेतकऱ्यांना सीमेवरच रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
पंजाब आणि हरियाणादरम्यानच्या शंभू सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीला पायी निघालेल्या 101 शेतकऱ्यांना अडविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. याशिवाय पोलिसांनी शेतकऱ्यांवर पाण्याचा फवाराही मारण्यात आला. यापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी ओले कपडे आणि गोण्यांचा वापर केला. शेतकरी आंदोलक आणि पोलीस यांच्यातील संघर्षात काही शेतकरी जखमी झाले आहेत.
यापूर्वी 6 आणि 8 डिसेंबरलाही शेतकऱ्यांनी दिल्लीकडे जाण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यांना हरियाणा पोलिसांनी रोखले होते. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अश्रूधुराचा वापर केला होता आणि या संघर्षात अनेक शेतकरी जखमीही झाले होते. शनिवारी पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी दिल्लीकडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना शंभू सीमेजवळ बॅरिकेड्स लावून रोखण्यात आले.





