बीजिंग – चिनची स्टार महिला टेनिसपटू पेंग शुईने आपल्यावर लैंगिक अत्यचार झाल्याचे आरोप केले होते. त्यानंतर आता तिने याबाबत घुमजाव केले. मात्र, पेंगने जीवाच्याच भीतीमुळे हे आरोप मागे घेतले असावेत, असा दावा जागतिक स्तरावरील काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते झांग गाओली यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप पेंगने केले होते. मात्र, आता तिने घूमजाव करताना मी असे कोणतेही आरोप केले नसल्याचे सांगितले आहे.
चीन ऑलिम्पिक संघटनेमार्फत आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या साहाय्याने पेंगसोबत संवाद साधला होता. लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर पेंग काही काळ बेपत्ताही होती. मात्र, हे केवळ गैरसमजातून निर्माण झाल्याचे मत पेंगने व्यक्त केले आहे.माझ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे मी कधीही म्हटले नाही. काही माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. त्यामुळेच गैरसमज निर्माण झाला, असे पेंगने सांगितले.
मात्र, पेंगला आपल्या जीवीताला धोका असल्याचे समजले असेल व त्यामुळेच तीने या संपूर्ण प्रकरणाबाबत घुमजाव केले असावे, असाही दावा आता करण्यात येत आहे.