सचिन व सेहवाग दिसणार वेगळ्या भूमिकेत

कोलकाता – भारतीय संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण व वीरेंद्र सेहवाग यांना फॅब फाईव्ह म्हणून ओळखले जाते. यातील तीन खेळाडू सध्या बीसीसीआयमध्ये वेगवेगळ्या भूमिकेत रुजू झाले आहेत.
आता सचिन व सेहवागही अशाच कोणत्यातरी जबाबदारीवर पुन्हा एकदा बीसीसीआयशी जोडले जातील, असे संकेत बीसीसीआयचे अध्यक्ष व माजी कर्णधार गांगुली यांनी दिले आहेत. एका टॉक शोमध्ये गांगुली यांना काही प्रश्न विचारण्यात आले त्यात सचिन व सेहवाग पुन्हा नव्या भूमिकेत दिसणार का, या प्रश्नावर गांगुली यांनी हे संकेत दिले.
गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत, द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत तर, लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) संचालक म्हणून कार्यरत झाले आहेत. त्यामुळे या फॅब फाईव्ह पैकी केवळ सचिन व सेहवागच सध्या बीसीसीआयशी जोडले गेलेले नाहीत.
बीसीसीआयच्या घटनेनुसार तसेच आर्थिक हितसंबंधांच्या मुद्द्यमुळे हे दोघे सध्या बीसीसीआयशी जोडले गेलेले नाहीत. मात्र, काही दिवसांतच याबाबत पर्याय शोधला जाईल व या दोन खेळाडूंकडेही मोठी जबाबदारी येणार आहे, असेही गांगुली यांनी सांगितले आहे.





