सातारा – साडेसहा कोटीचे टेंडर अन् कचरा मात्र रस्त्यावर

सातारा – सातारा पालिकेने तब्बल साडेसहा कोटींची निविदा कचरा संकलनासाठी काढली आहे. तरीही संबंधित ठेकेदाराकडून हद्दवाढीतल्या भागासह शहरातील कचरा व्यवस्थित उचलला जात नसल्याची तक्रार आहे. 40 पैकी सहा घंटागाड्या बंद अवस्थेत असून हद्दवाढीतील भागातले पाच ट्रॅक्टर कचरा उचलतात. मात्र, त्याचा जीपीएस गायब असल्यामुळे नक्की किती कचऱ्याचे संकलन होते याची माहिती मिळेनाशी झाली आहे.
प्रशासक अभिजित बापट यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागाचे सक्षम कारभारी नक्की करतात काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. पालिकेचे प्रशासक राज सध्या ठेकेदारांच्या मनमानीपणामुळे गाजू लागले आहे. गेल्या अडीच वर्षाच्या काळात बिलो टेंडरिंग आणि ओव्हर टेंडरिंगचा पक्का खैंदूळ चालू आहे. कचरा उचलण्याची निविदा साडेसहा कोटींची प्रसिद्ध झाली असून कचरा संकलनाची जबाबदारी स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा संस्थेला देण्यात आली आहे. संबंधित ठेकेदार सदरबाजार मधील असून त्याचे कचरा संकलनाच्या प्रक्रियेकडे लक्ष नसल्याची तक्रार आहे. चाळीस घंटा गाड्या आणि पाच ट्रॅक्टर शहरातील मुख्य भागासह हद्दवाढीच्या क्षेत्रात कचरा उचलतात . तब्बल 52 टन कचरा उचलला जातो. मात्र, काही घंटागाड्या बंद ठेवण्यात आल्या असून तांत्रिक दुरुस्तीचे कारण देण्यात आले आहे. काही घंटागाड्यांचे आणि ट्रॅक्टरचे जीपीएस उपलब्ध नसल्याने प्रत्यक्षात किती कचरा उचलला जातो, एखादी गाडी कुठून कुठपर्यंत किती प्रवास करते हे समजत नाही. त्यामुळे लेखा विभागाकडून निघणाऱ्या बिलामध्ये पारदर्शकता नसल्याची तक्रार आहे . संबंधित ठेकेदाराच्या संस्थेने दोन वर्षांपूर्वी कामगारांचे पीएफ रक्कम भरली नसल्याने काळ्या यादीत टाकण्याची वेळ आली होती.
आरोग्य विभागाचे ठेकेदाराशी संगनमत?
आरोग्य विभागाचे सक्षम कारभारी प्रवीण यादव यांचे ठेकेदारांवर कोणतेही नियंत्रण नाही. आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांच्याकडे चार्ज देण्यात आलेला नाही. मात्र, अनेक कारणांमुळे त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. त्याच्या नोटीसा काढून आस्थापना विभाग घाईला आला आहे. कचरा संकलन न झाल्याने शहराच्या अनेक ठिकाणांना कचरा कोंडाळ्याचे स्वरूप आले आहे. तब्बल साडेसहा कोटींची ही निविदा ठेकेदाराला पोसण्यासाठी दिली आहे काय? आरोग्य विभागाचे ठेकेदाराशी काही संगनमत आहे काय? असे संशयास्पद प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. घंटागाडीच्या कचरा संकलनाचे गणित जुळत नसल्याने ऐन निवडणुकीत सातारा शहर कचऱ्याचे आगार बनले आहे





