Tender Vote : राज्यातील २९ महानगरपालिका (महापालिका) निवडणुकीसाठी आज, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान सुरू असताना, अनेक ठिकाणी मतदारांना धक्कादायक अनुभव आला. मतदान केंद्रावर पोहोचल्यावर त्यांना कळले की, त्यांच्या नावावर आधीच कोणीतरी मतदान करून गेले आहे. अशा परिस्थितीत मतदारांचा हिरमोड होण्याची शक्यता असते, पण निवडणूक आयोगाने अशा बोगस किंवा दुबार मतदानापासून खऱ्या मतदारांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी ‘टेंडर व्होट‘ (Tendered Vote) ही विशेष तरतूद केली आहे. टेंडर व्होट म्हणजे काय? टेंडर व्होट ही भारताच्या निवडणूक प्रक्रियेची एक महत्त्वाची सुरक्षा यंत्रणा आहे. जेव्हा एखादा खरा मतदार मतदान केंद्रावर येतो आणि त्याला कळते की, त्याच्या नावावर आधीच कोणीतरी (बोगस मतदाराने) मत टाकले आहे, तेव्हा तो टेंडर व्होट मागू शकतो. ही तरतूद निवडणूक संचालन नियम, १९६१ च्या कलम ४९-पी (Rule 49P) अंतर्गत आहे. या प्रक्रियेमुळे मतदाराचा लोकशाहीतील मूलभूत हक्क अबाधित राहतो आणि बनावट मतदानाला आळा बसतो. टेंडर व्होट मिळवण्यासाठी काय करावे लागते? मतदान केंद्रावरील पीठासीन अधिकाऱ्याला (Presiding Officer) त्वरित सांगा की, तुमच्या नावावर आधीच मतदान झाले आहे. तुमचे मतदार ओळखपत्र (Voter ID / EPIC) किंवा इतर वैध ओळखपत्र (जसे आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) दाखवा आणि तुम्हीच खरा मतदार आहात हे सिद्ध करा. अधिकाऱ्याकडून तुमची ओळख पटवण्यासाठी काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. खात्री पटल्यानंतर ते तुम्हाला टेंडर व्होट देण्यास परवानगी देतील. यासाठी कोणतीही अतिरिक्त फी लागत नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आणि कायदेशीर आहे. टेंडर व्होटची मतदान पद्धत कशी असते? टेंडर व्होट ईव्हीएम (EVM) द्वारे दिले जात नाही. त्याऐवजी पीठासीन अधिकाऱ्याकडून तुम्हाला एक विशेष मतपत्रिका (Tendered Ballot Paper) दिली जाते, ज्यावर ‘Tendered Ballot Paper’ असे लिहिलेले असते. या मतपत्रिकेवर तुमच्या पसंतीच्या उमेदवारासमोर शिक्का (क्रॉस मार्क) मारून मतदान करा. मतदान झाल्यानंतर ही मतपत्रिका एका विशेष लिफाफ्यात (Envelope) बंद करून पीठासीन अधिकाऱ्याकडे सुपूर्द केली जाते. हे मत स्वतंत्रपणे जपून ठेवले जाते आणि त्याची नोंद फॉर्म १७-बी मध्ये केली जाते. टेंडर व्होट्सची गणना कधी होते? टेंडर व्होट्सची गणना सामान्यतः सुरुवातीला केली जात नाही. ईव्हीएममधील सर्व मते प्रथम मोजली जातात. मात्र, जर दोन उमेदवारांमधील विजयाचे अंतर अतिशय कमी असेल (उदा. काही मतांचा फरक) आणि टेंडर व्होट्सच्या संख्येमुळे निकालावर परिणाम होऊ शकत असेल, तेव्हाच न्यायालयाच्या आदेशाने किंवा विशेष परिस्थितीत या मतांची मोजणी केली जाते. बहुतेक प्रकरणांत, मोठ्या फरकामुळे ही मते गणनेच्या बाहेर राहतात.