पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला दहा वर्षे सक्तमजुरी

पुणे: शारीरिक, मानसिक छळ करत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 7 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधिश आर. व्ही. अदोणे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

मिथुन तानाजी मोरे (वय 23, रा. पदमावती) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. त्याची पत्नी मयूरी (वय 22) असे यांनी 14 मार्च 2012 रोजी आत्महत्या केली. मिथूनच्या आई-वडिलांना दोघांना वेगळे राहण्यास सांगितले होते. त्यानुसार दोघांनी स्वतंत्र संसार थाटला होता. मिथून हा दररोज दारू पिऊन घरी जात होता. मयुरी ही सहा महिन्यांची गरोदर होती. घटनेच्या दिवशी तीने मिथून याला जन्माला येणाऱ्या बाळाचा विचार करून दारू न पिण्याचा सल्ला दिला. त्यावेळी मिथून याने गंमतीने मयुरीला त्याला मारण्यास सांगितले. त्यानुसार मयुरीने मिथूनच्या गालावर हलकी चापट मारली. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. मिथून याने मयुरीला बेदम मारहाण केली. त्यावेळी तू माहेरी निघून जा, मी तुला नांदवणार नाही, असे तो तिला म्हणाला.

मात्र, मयूरीने माहेरी जाण्यास नकार देत मी आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. तिने रॉकेल अंगावर ओतून घेत स्वतःला पेटवून घेतल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये तपासी अधिकारी, मृत्युपुर्वी साक्ष नोंदवणारे नायब तहसीलदार, तक्रारदार यांची साक्ष महत्वाची ठरली. खटला गंभीर असून, मयूरी ही सहा महिन्यांची गरोदर होती. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. पाठक यांनी केली. न्यायालयीन कामकाजामध्ये सहकारनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आर. एन. नागवडे यांनी मदत केली. पैरवी अधिकारी म्हणून कुंभार यांनी काम पाहिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.