नगर – जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज एकूण पाच रुग्ण करोनामुक्त झाले. यामध्ये श्रीगोंदा फॅक्टरी येथील दहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. आज अखेर जिल्ह्यात 95 जणांनी करोनावर मात केली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
आज नगर शहरातील बूथ हॉस्पिटलमधून या बालकासह पिंपळगाव खांड (ता. अकोले) येथील 45 वर्षीय व्यक्ती आणि 18 वर्षीय युवती तसेच नेवासा बुद्रूक येथील 24 वर्षीय युवकाला आज घरी सोडण्यात आले. तर, संगमनेर येथील 65 वर्षीय व्यक्तीही करोनामुक्त झाला आहे. मात्र, त्या रुग्णाला एक दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून, त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयाकडून आलेल्या अहवालापैकी काल सायंकाळी जिल्ह्यात आणखी 12 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर 61 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. माळीवाडा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना करोनाची लागण झाली आहे. यापूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय, मार्केट यार्ड येथील 37 वर्षीय महिला करोना बाधित आढळली आहे. तर केडगाव येथील 55 वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली आहे. तसेच शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील 60 वर्षीय व्यक्तीसह पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
भांडूप (मुंबई) येथून शेवगाव येथे आलेल्या 55 वर्षीय पुरुष आणि 50 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली असून जिल्ह्यात बाधितांची संख्या 195 झाली आहे. त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा प्रशासनाने शोध सुरु घेवून त्यांचे अहवाल जिल्हा रुग्णालयात तपासणी साठी पाठविण्यात आले आहे. मात्र त्याचे अहवाल अद्यापही आले नसल्याने जिल्ह्यात रुग्णांची संख्या 195 झाली आहे.