शिरवळ -खंडाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बहुउद्देशीय सभागृहाच्या खालच्या भिंतीलगत आडोशाला बेकायदा बिगरपरवाना गांजाच्या दहा झाडांची लागवड करून ती जोपासल्याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडून सात हजार 175 रुपये किमतीचा एक किलो 435 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. लल्लु श्रीराम (रा. माझीलगाव जाजूपुर बस्ती, उत्तर प्रदेश) व चंदन ओमनानूदास भारती (रा. बिशनपूर राणापार ता. गोरखपुर ,उत्तर प्रदेश सध्या रा. खंडाळा) अशी दोघांची नावे आहेत. याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील बहुउद्देशीय हॉल भाडेकराराने जयंत पॅकिंग इंडस्ट्रीज प्रा. लि. खंडाळा मुंबई या कंपनीला दिलेला आहे. त्या हॉलमध्ये लाकडाचे पॅलेट बनविण्याचे काम केले जाते. हे काम करण्याकरता उत्तर प्रदेशमधील पाच कामगार काम करतात. ते कामगार त्याच ठिकाणी हॉलमध्ये राहतात. शनिवारी पहाटे चार वाजता खंडाळा पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड व पोलीस नाईक प्रशांत धुमाळ शासकीय वाहनातून रात्रगस्त घालत असताना एक व्यक्ती बहुउद्देशीय हॉललगत असलेल्या भिंतीजवळ पोलीस गाडी पाहून संशयास्पदरित्या अचानक लपून बसल्याचे दिसले. त्याचवेळी त्या ठिकाणी जाऊन खात्री करण्याकरिता त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याने व त्याच्या साथादीराने मिळून बहुउद्देशीय हॉलच्या पूर्व भिंतीलगत गांजाची अंदाजे सहा महिन्यांपूर्वी लागवड केली. ती झाडे मोठी झाली असल्याने ती दिसू नयेत, म्हणून त्यावर मच्छरदाणीचे पांढरे कापड टाकले आहे. त्याठिकाणी भिंतीच्या आडोशाला दोन ते चार फूट उंचीची एकूण दहा झाडे असल्याचे दिसून आले. त्याची खात्री केली असता ती गांजाची झाडे असल्याचे निष्पन्न झाले. दोघांनी गांजाच्या झाडांची विनापरवाना लागवड केलेली असल्याची कबुली दिली. संशयितांकडून लागवड केलेली दहा झाडे जप्त केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड करीत आहेत.