नेवासा : नेवासा तालुक्यातील रानमळा वस्ती येथील मुख्य पुलाच्या बांधकामाचे काम संथ गतीने सुरू असताना, पर्यायी व्यवस्था म्हणून नळ्या टाकून उभारलेला तात्पुरता पूल गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. यामुळे रानमळा येथील नागरिकांचा नेवासा शहराशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. परिणामी, नागरिकांना नेवाशाला जाण्यासाठी हंडीनिमगाव मार्गे लांबचा फेरफटका मारावा लागत असून, हा प्रवास अत्यंत त्रासदायक ठरत आहे. रानमळा येथील नव्या पुलाचे बांधकाम सध्या प्राथमिक टप्प्यात असून, अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या कालावधीत नागरिकांच्या ये-जा साठी तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. मात्र, मुसळधार पावसामुळे हा पूल वाहून गेल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे रानमळा वस्तीवरील नागरिकांना दळणवळणाच्या गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेवासा शहराशी संपर्क तुटल्याने दैनंदिन गरजा, बाजारपेठ, वैद्यकीय सेवा यांसारख्या सुविधांपासून नागरिक वंचित राहत आहेत. स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत नवीन पूल पूर्ण होत नाही, तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपाची ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रशासन या समस्येकडे कितपत गांभीर्याने लक्ष देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.