कात्रज : कात्रज चौकात रात्री पावणे नऊच्या सुमारास उड्डाणपुलाखाली फ्रोजन चिकन वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. कात्रजहून नवले पुलाकडे जात असलेला हा टेम्पो अचानक थांबला आणि काही क्षणातच बोनेटमधून ज्वाळा बाहेर पडू लागल्या. घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीने प्रयत्न करून आग विझवण्यात यश मिळवले. प्राथमिक माहितीनुसार, टेम्पोच्या बोनेटमध्ये असलेल्या एसी यंत्रणीत बिघाड झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आग लागल्यानंतर काही वेळ कात्रज चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. भारती विद्यापीठ वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तातडीने पर्यायी मार्गांचा वापर करत वाहतूक सुरळीत केली.या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून टेम्पोचे बोनेट पूर्णपणे जळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.