वाघोली – टेम्पोमध्ये तीन गिर गायींना क्रूरपणे बांधून कत्तलीसाठी नेणाऱ्या दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघेश्वर चौकामध्ये गायींना घेऊन जाणारा टेम्पो पकडला असून याप्रकरणी गणेश म्हस्के यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. वाघोली येथे मंगळवारी (दि. 8) रोजी रात्री दहाच्या सुमारास टेम्पोमधून तीन गिर गाई रस्सीने बांधून चारा, पाण्याविना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वाघेश्वर चौकात वाहन थांबवून याबाबत चौकशी केली. परंतु चालक व त्याच्या साथीदाराकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने वाहनासह चालक व साथीदाराला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीत गाई कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तीन गिर गाईंची सुटका करून संगोपनासाठी नजीकच्या गोशाळेत रवानगी केली. असिफ पैगंबर सैय्यद व आरिफ पैगंबर सैय्यद (रा. शिंदे वस्ती, हडपसर, पुणे) यांच्या विरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.