Temple Theft – शहरातील भीमा नदीकाठी वसलेल्या पांडवकालीन प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरात सोमवारी (दि. 20) पहाटे घडलेल्या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दोन दानपेट्या फोडून भाविकांच्या श्रद्धेने अर्पण केलेल्या रकमेवर डल्ला मारला. विशेष म्हणजे हे मंदिर खेड पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असतानाही ही घटना घडल्याने पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या शुक्रवार ते रविवारदरम्यान भोपाळबुवा आणि सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली होती. हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या यात्रेनंतर अवघ्या काही तासांतच मंदिरात चोरी होणे अधिकच धक्कादायक ठरत आहे. यात्रेदरम्यान दानपेट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याचा अंदाज असून, त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. सोमवारी सकाळी पुजारी नियमित पूजेसाठी मंदिरात आले असता दानपेट्या फोडलेल्या अवस्थेत आढळून आल्या आणि चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथकासह तपास सुरू करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. चोरीची नेमकी रक्कम अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी भाविकांच्या दानावर डल्ला मारल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, ही एकच घटना नसून राजगुरुनगर परिसरात देवस्थानांना लक्ष्य करणार्या चोर्यांची मालिका सुरू असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी खरपुडी व निमगाव येथील खंडोबा मंदिरांसह इतर ठिकाणीही चोरीचे प्रकार घडले असून त्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. सततच्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सखोल व जलद तपास करून आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.