पुणे – शहरातील तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. बुधवारीदेखील एक अंशाने घट झाली. किमान तापमान 10.6 इतके नोंदवले गेले. सरासरीच्या तुलनेत ही घट 4.7 अंश सेल्सिअस इतकी असून, 2016 नंतर प्रथमच तापमानाचा पारा 10 अंशापर्यंत घसरला असल्याचे हवामान विभागाच्या नोंदीमधून समोर आले आहे.
शहरात थंडीचे आगमन झाले आहे. अद्याप कडाक्याची नसली तरी वातावरणातील गारवा वाढला आहे. पहाटे आणि संध्याकाळी असलेला गारवा आता दुपारीही जाणवत असून, तापमानात सातत्याने घट होत आहे. मंगळवारी शहरातील तापमान 11.3 अंश सेल्सिअस इतके होते. यामध्ये एक अंशाने घट होऊन बुधवारी किमान तापमान 10.6 इतके नोंदवल्या गेले.
दरम्यान, राज्यातील इतर भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला असून, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमधील तापमानात घट झाल्याची नोंद हवामान विभागाने घेतली. पुढील काही दिवस थंडीची ही स्थिती कायम राहणार असून, तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.